आज महानत्यागी बाबा जुमदेवजींच्या पुण्याईने आपण सेवकांना सुंदर जीवन मिळाले व तत्व, शब्द, नियमांच्या आचरणाच्या माध्यमातून आदर्श कुटुंब घडविता आले. खरोखर आपल्या मार्गातील नियमच असे आहेत की या नियमांचे पालन केले की आपोआप कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांवर विश्वास संपादित होतो. जसे चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे. आई-वडिलांच्या शब्दांचे पालन करणे, सेवकांत व कुटुंबात एकता कायम करणे, सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे. व्यभिचार व चरित्रहनन कृत्य आपल्या मार्गात वर्ज्य आहे. म्हणजे आपण आपल्या मार्गातील नियमांच्या बाहेर जाऊन जर कर्म केले तर यामुळे कौटुंबिक जीवन व विश्वास उद्ध्वस्त होते हे आपल्याला माहिती आहे. तसेच आपल्या कुटुंबातील एक महत्वाचा विकार असतो, तो म्हणजे "राग". जोपर्यंत या विकाराचा नाश होत नाही तोपर्यंत कुटुंबाचे कल्याण होत नाही.
"बंदूक से निकली गोली और मुँह से निकली बोली, कभी वापस नही आती, वह वार करती है"।
आपल्यात सहनशीलतेची कमतरता आहे म्हणून आपल्याला लवकर राग येतो व त्या रागाच्या भरात आपण वाईट शब्दांचा प्रहार इतरांवर करतो. पण आपण तेव्हा विसरतो की, वाईट शब्दांचा प्रहार केल्याने त्यांचे काहीच नुकसान होत नाही, तर उलट आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो. कारण राग म्हटलं तर,
"दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे, म्हणजेच "राग" होय".
तसेच राग हा मानवाच्या विवेकशक्तीचा नाश करतो. मानवाला बुद्धिहीन बनवतो.
"ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, त्याचप्रमाणे रागात असलेल्या माणसाला आपले कल्याण दिसत नाही".
म्हणून सेवकांनी नेहमी प्रयत्न करावे की, आपल्याला राग येऊ नये. त्याकरिता प्रत्येक सेवकांनी आपल्या घरात पाण्याची सोय ठेवावी. कारण, क्रोध हा अग्नी आहे व या अग्निमुळेच गृहस्थी जीवन होरपळून निघते. म्हणून प्रत्येकाने आपल्या कुटुंबात "सहनशीलता" नावाच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवावी.
सासू अग्नी झाली, तर सुनेने पाणी व्हावे. सून अग्नी झाली तर सासूने पाणी व्हावे. वडील अग्नी झाले तर मुलाने पाणी व्हावे, पती अग्नी झाला पत्नीने पाणी व्हावे आणि पत्नी अग्नी झाली तर पतीने जलधारा व्हावे. असे आचरण जर आपण आपल्या कुटुंबात ठेवले तर, कोणाच्याही तोंडून वाईट शब्द निघणार नाहीत कारण, समोरून त्या रागाला प्रतिसाद मिळणार नाही, त्यामुळे रागाचे रूपांतर वाईट शब्दात होणार नाही. अशा रीतीने आपण आपल्या घराला स्वर्ग बनवु शकतो.
"माणूस जन्माला आला की, एका वर्षातच बोलणे शिकून जातो. पण बोलायचे काय हे शिकायला त्याला पूर्ण आयुष्य देखील कमी पडते".
सेवकांच्या कुटुंबात सर्वप्रथम कोणाची निंदा करणे, चुगली करणे, कोणाचे वाईट चिंतने या गोष्टींवर बंधन असावे व याकडे विशेषतः कुटुंब प्रमुखाने लक्ष ठेवावे. जर आपल्या कुटुंबातील एखादा सदस्य तत्सम व्यक्तीबद्दल अर्वाच्य भाषेत बोलत असेल, त्याची निंदा किंवा चुगली करीत असेल तर तेव्हा कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याला तिथेच थांबवायला हवे. तसेच कोणी आपल्या घरी येऊन इतर व्यक्तींबद्दल चुकीच्या गोष्टी, निंदा व चुगली सांगत असेल तेव्हा पण कुटुंबातील सदस्यांनी त्यांना सरळ खडसावून सांगावे की इथे कोणाचीही निंदा वगैरे करू नको. जेणेकरून दुसऱ्यांमुळे आपल्या घरातील वातावरण बिघडणार नाही. आपल्याकडे जो फावला वेळ उरतो त्या वेळेत चर्चा करायचीच आहे तर भगवंताविषयी करा. या चर्चेत कर्मयोग आहे, तर इतर व्यक्तींबद्दलच्या चर्चेत फक्त कर्मभोग आहे. दुसऱ्या व्यक्तींकडून आपल्या कानात कचरा भरण्याऐवजी फावल्या वेळेत बाबांचे मार्गदर्शन ऐका व आपल्या आकारातील विकार काढा. असे आचरण जर आपण आपल्या कुटुंबात केले तर नक्कीच एकमेकांवरचा विश्वास हा वृद्धिंगत होईल. कारण, आपला मार्ग हा एकट्याचा नाही तर एकतेचा आहे याचे भान कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ठेवावे.
आपण जेव्हा मार्गात येतो तेव्हा आपल्यावर असंख्य बाह्य संकटे आपल्याशी दोन दोन हात करायला सदैव तत्पर असतात आणि इतिहास साक्षी आहे जेव्हा केव्हा बाह्य शक्तींशी लढायची वेळ येते तेव्हा आपण आपआपसातील मतभेद दूर सारून एक होतो आणि विजयी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.
मार्गात येताना सुद्धा हीच एकीची शक्ती महत्वाची ठरते. एकतेने घेतलेले निर्णय परमेश्वराने घेतलेले निर्णय असतात. त्यात कोणतेही संभ्रम उरत नाही. ते विचारशिल व सर्वांचे हीत जोपासणारे असतात. येथेच दया, क्षमा आणि शांती उगम पावते. अशाच ठिकाणी ईश्वरी शक्तीचा अधिक प्रभाव पहायला मिळते. जिथे एकतेचा विचार येतो, तिथे ही एकता टिकविण्यासाठी प्रयत्नही होतात त्यामुळे घरातील सर्वांमध्ये क्षमाशिलता वाढते.. लहानसहान गोष्टींना उगाच ताणलं जात नाही. ह्याच सामंजस्यामुळे वादविवाद उद्भवत नाही आणि उद्भवलेच तर लवकर मार्गीही लागतात. घरातील शांतता टिकून राहते. अशाच ठिकाणी भगवतकृपा सदैव टिकून राहते.
परंतु बाह्य संकट दूर होताच कधीकधी मात्र काही सेवक आत्ममुग्ध व्हायला लागतात. मार्गात येतानाचा पहिला दिवस विसरू लागतो व अट्टाहासी बनू लागतो, असहनशिल बनू लागतो आणि येथेच त्याच्यातील एकतेच्या विचारांना तडा जायला सुरुवात होते. त्याला कुणाच्याही मदतीची गरज भासत नाही, त्याच्यात अहंभाव निर्माण होतो आणि अशा वेळी कालांतराने तो एकाकी पडतो त्याला परमेश्वरही साथ देत नाही. तो पुन्हा दुःखास पात्र होतो..
म्हणून मी पुन्हा एकदा सांगू ईच्छितो-
कुटूंब किंवा सेवक परीवार म्हणजे त्या परीवारातील सदस्यांची संख्या नसून आपआपसातील एक असल्याचा भाव म्हणजेच एकता होय.
लक्षात घ्या एकीचे बळ देई सदविचारांचे फळ…
एकमेकांचे पाय ओढणाऱ्या समाजात आपले वेगळेपण म्हणजे कुटूंबात व सेवकात एकता कायम करणे होय. हीच आपली ओळख आहे. हीच आपले बलस्थान आहे, शक्ती आहे. याशिवाय आपली जग हसाई निश्चित आहे.
अजुनही वेळ गेलेली नाही. शरीराने एकत्र येऊ शकत नसू तर मनाने दूर तरी नका जाऊ. जो आपल्या एकीच्या शक्तीला मनापासुन टीकवण्याचा प्रयत्न करतो तेथे सदविचारांची गंगा वाहते आणि त्याच हृदयात परमेश्वराचा वास असतो.
आणि म्हणूनच बाबांनी म्हटले आहे:-
"मानव अपने जीवन में एकता की भावना के बिना भगवत कृपा पा नहीं सकता"
■ लेखन :- रवि नारायणजी मेश्राम
■ पत्ता :- बी-५२, शिवछत्रपती नगर, कामठी, जि. नागपूर
■ सेवक नंबर :- ४०५४
■ परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर
प्रकाशन - Parmatma Ek News & Info
Website : https://www.parmatmaeknews.com/home