'महानत्यागी बाबा जुमदेवजी' यांच्या शिकवणीनुसार, 'परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर' यांच्या विद्यमाने, मौदा तालुक्यातील पावडदौना येथील 'परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रमात' भव्य 'सामूहिक विवाह सोहळा' अत्यंत आनंदी आणि मंगलमय वातावरणात पार पडला.
हा सोहळा रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपन्न झाला. समाजातील २६ जोडप्यांनी या सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली.
या प्रसंगी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे विचार आणि संस्कारांचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
ह्या सामाजिक उपक्रमात नागपूर मंडळाचे अध्यक्ष श्री. रविंद्रजी गायधने, सचिव श्री. किरणजी राऊत, मंडळाचे इतर पदाधिकारी, संचालक, मार्गदर्शक, कार्यकर्ता, परमात्मा एक सेवक - सेविका, वधू - वर पक्षाचे वऱ्हाडी, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाला स्थानिक खासदार श्री.श्यामकुमारजी बर्वे, स्थानिक पोलिस प्रशासन प्रमुख श्री. सारीनजी दुर्गे, नागपूर परिसरातील आमदार श्री.कृष्णाजी खोपडे, स्थानिक मौदा शहराचे नगराध्यक्ष श्री.प्रसन्नाजी तिडके, स्थानिक सरपंच, लोकनेते यांनी उपस्थिती दर्शविली.
ह्या विवाह सोहळ्यातील नव वर - वधू दाम्पत्यांना पलंग, गादी, कुलर, फ्रिज, फॅन, ब्लँकेट बेडशीट, कपाट, भांडे यासारख्या बऱ्याच गृहपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे नेटके नियोजन व व्यवस्थापन 'परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ' च्या पदाधिकारी, मार्गदर्शक, कार्यकर्ता आणि स्वयंसेवकांनी केले होते. मौदा आणि आसपासच्या परिसरातील शेकडो सेवक आणि नातेवाईक या सोहळ्याचे साक्षीदार बनले.
हा उपक्रम समाजातील आदर्श ठरला असून, अशा सामूहिक उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा आणि आर्थिक बचत दोन्ही साधले जाते, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.